मुंबई: भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पण, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नव्हतं. त्यावरुन असं दिसून येतं की राज्यातील महायुतीमधील भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. याचदरम्यान आता शिवसेना शिंदे गटाने महाराष्ट्रात लोकसभेच्या २२ जागा मागितल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं की, शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावर २२ जागांवरुन निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही आमची तेवढ्याच जागांची मागणी आहे.
शिंदे गटाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २०१९ मध्ये २२ जागांवरुन निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी १८ जागा त्यांनी मिळवल्या होत्या. त्यामुळे यंदाही २२ जागा मिळवण्यासाठी ते आग्रही आहेत. लवकर याबाबत तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. महायुती सरकारमधील वातावरण चांगलं असून कोणीही नाराज नाही, असंही शिंदे गटाने स्पष्ट केलं. जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा केली जाईल आणि योग्य तो मार्ग काढला जाईल. कोणीही नाराज होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.



