मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्यानं भाजपची दुसरी यादी अद्याप आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी अशी विनंती शिंदेंकडून करण्यात आली आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेतील ६ खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजप नेतृत्त्व उत्सुक नाही. भाजप हायकमांडचं मत त्यांच्याबद्दल अनुकूल नसल्यानं त्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेच्या १३ पैकी ६ खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी भाजपनं सर्वेक्षणांचा हवाला दिला आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी, वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासह अन्य दोन खासदारांविरोधात जनतेच्या मनात रोष असल्याचं भाजपनं सांगितलं आहे. त्यामुळे शिंदेंना या मतदारसंघात उमेदवार बदलावेत, अशी अट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिंदेंसमोर ठेवली आहे. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचं वृत्त ‘दिव्य मराठी’नं दिलं आहे.
भाजपची अट, विषय कट
महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भाजप आधी शिंदेंना अधिक जागा सोडण्यास तयार नव्हता. आता भाजपनं शिंदेंच्या अर्धा डझन खासदारांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवला आहे. या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी द्या, अशी अटच भाजपकडून घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवार बदलण्यास विरोध दर्शवला. त्यावर उमेदवार बदला, अन्यथा चर्चा पुढे जाणार नाही, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली. त्यामुळे आता शिंदेंसमोर उमेदवार बदलण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत शिंदे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल.



