देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कामाला लागले असल्याचे दिसत आहे. कुठे पाठिंबा तर कुठे माघार अशी एकूणच संपूर्ण देशात परिस्थिती आहे. दरम्यान या सगळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) – आठवले गटचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी,त्यांच्या पक्षाचा देशभरातील भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) लोकसभा उमेदवारांना पाठिंबा असेल अशी घोषणा केली.
एनडीए जागा 400 चा आकडा पार करेल
रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभेच्या निवडणुकीविषयी भाष्य केले. यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करून इतिहास रचणार आहे. या निवडणुकीत एनडीए जागा 400 चा आकडा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




