पुणे: पुण्यातील तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढेच रेंगाळला असल्याने दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि उकाडा वाढला आहे. रात्रीचा गारवाही हरवला आहे. सोमवारीदेखील सलग दुसऱ्या दिवशी तापमानात वाढ होऊन दिवसभरात कमाल ३६.९ आणि १५.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाने मार्च आणि एप्रिल महिन्यात यंदा उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून, उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवली आहे. गेल्या आठवडाभरात पुण्यासह संपूर्ण राज्यातील तापमान कोरडे असून, कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. किमान तापमानात मात्र राज्यात अजून चढउतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा ११ अंशांपर्यंत खाली घसरला होता, तर कमाल तापमान ३५ अंशांपुढे होते. त्यामुळे सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचे चटके सगळ्यांनी अनुभवले.
पुण्यात तापमान राहणार स्थिर
पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून, कमाल स्थिर आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल. पुण्यात मात्र तापमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.




