कराड : ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे विद्यमान खासदार आहेत, त्या जागा ज्या त्या पक्षाला सोडायची, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. साताऱ्याची जागा आपल्यालाच मिळणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आणि बूथनिहाय मेळावे घेऊन कामाला सुरुवात करावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथील दौऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केली.
लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आणि साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेसंदर्भात ते म्हणाले, “लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात दिल्लीत काल बैठक होणार होती. भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड जागावाटपासंदर्भात चर्चेसाठी बसणार होते. त्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकलली आहे. ती आज किंवा उद्या होऊ शकते. जागावाटपासदंर्भात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून प्राथमिक चर्चा केली आहे. त्यात बहुतेक सिटिंग जागा ज्या-त्या पक्षाला सोडायची, अशी प्राथमिक चर्चा झालेली आहे.
शरद पवार यांनी सुनील
शेळके यांना दिलेल्या इशाऱ्यावर ते म्हणाले, “वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांनी काय मत व्यक्त केले ते आणि मी सुनील शेळके यांची भूमिका ऐकून पुण्यात माझी भूमिका मांडली आहे.
नीलेश लंके यांच्याबद्दल माध्यमांतच चर्चा सुरू आहे. त्यात तथ्य नाही, असे सांगून पवार म्हणाले, “लंके यांनी माध्यमांना काय सांगायचे ते सांगितले आहे. मीही त्यांची चर्चा ऐकली आहे. ज्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यांनीच उत्तर दिले असताना त्यावर मी उत्तरे देण्याचे काही कारण नाही असे स्पष्ट केले.



