
मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. गिरीश महाजन यांच्याकडून याआधीदेखील असे दावे करण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपात विरोधी पक्षांमधून मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश झाले आहेत. त्यांनी आतादेखील तसं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांमध्ये काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “मी याआधी देखील सांगितलं होतं. माझ्या संपर्कात काँग्रेसमधील अनेक नेते आहेत. मी यापूर्वीदेखील सांगितलं होतं की, अनेक भूकंप होतील. त्यापैकीच अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडला. ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच मोठे भूकंप पाहायला मिळतील”, असं मोठं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले. शिल्लक सेना आणि शरद पवार यांची शिल्लक राष्ट्रवादी, त्यांनी स्वतः कडे बघावं. आणखी काही नेते भाजपमध्ये येतील. जे आज टीका करत आहेत ते उद्या आमच्यात प्रवेश करतील. मी सर्वांची नावे घेत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची रॅली जशीजशी मुंबईत शिवाजी पार्क येथे येईल तसे अनेक धक्के त्यांना बसतील”, असा मोठा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.


