लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो अशी स्थिती आहे. अशात एका ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीला म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या सगळ्या पक्षांना मिळून ४१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सात जागा मिळतील असा अंदाज आहे. News 18 च्या मेगा ओपिनियन पोलने हा अंदाज वर्तवला आहे.

काय आहे पोलचा अंदाज?

या पोलच्या सर्व्हेनुसार टक्केवारी पाहिली तर ४८ टक्के मतं ही महायुतीला तर ४३ टक्के मतं महाविकास आघाडीला पडू शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक जागा असलेलं राज्य आहे. ओपनियन पोलसाठी जो सर्व्हे करण्यात आला तो १२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीतला आहे. भारतभरात हा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा देशात एनडीएला होणार हेच हा ओपिनियन पोल सांगतो आहे.