मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य (उत्तर पश्चिम) मुंबई या तीन जागांची मागणी आहे. दक्षिण मुंबईवर भाजपने जोरदार दावा ठोकला असला, तरी शिवसेनेकडून येथून माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये पुन्हा राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र वायव्य मुंबईमध्ये शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हेच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्चित असल्याने, त्यांना योग्य टक्कर देण्यासाठी या जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवसेनेला शर्थ करावी लागत आहे.
भाजपने बुधवारी लोकसभा उमेदवारांची राज्यातील पहिली, २० जणांची यादी जाहीर केली. यामध्ये उत्तर मुंबईमधून पीयूष गोयल यांना, तर ईशान्य मुंबईमधून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता मुंबईतील चार मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करावयाचे आहेत. त्यापैकी उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन या भाजपच्या आहेत. उर्वरित तीन मतदारसंघांपैकी, वायव्य मुंबईत गजानन कीर्तिकर आणि दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन खासदार आहेत. तर दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार आहेत.
दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर दक्षिण मुंबईतील विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव गटातच असल्याने, त्या जागेवर भाजप दावा सांगत आहे. त्यातही शिंदे यांच्या शिवसेनेने यशवंत जाधव यांचे नाव पुढे केले आहे. ही जागा त्यांना कितपत मिळेल, याविषयी शंका आहे.



