
बुलढाणा : जागावाटप अन् उमेदवारीचा गुंता कायम असलेल्या आणि दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील गुंता अर्धा तरी सुटल्याचे स्पष्ट राजकीय संकेत मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षाने अंतिम टप्प्यात ‘जोर’ न लावल्याने बुलढाण्याची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सुटणार असल्याचे वृत्त आहे. २० तारखेला नक्की झालेला उद्धव ठाकरेंचा दौरा याला दुजोरा देणारा ठरला आहे.
मागील तीन लढतीत सलग विजय मिळविणारे खासदार प्रतापराव जाधव यांच्या तिकिटाची ‘गॅरंटी’ नाही, असे विचित्र चित्र आहे. भाजपाने या जागेवर जोरकस दावा करून येथे लढण्याची सुसज्ज तयारी केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा राजकीय प्रतिष्ठेची बाब केली आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करणारी भाजपाही मागे हटायला तयार नाही, असे सध्याचे चित्र आहे.



