
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेर मुंबईने गेल्या ८ वर्षांचा दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत विदर्भचा पराभव करून ४२ व्यांदा विजेतेपद पटकावले. यापूर्वी मुबंईने २०१५-१६ मध्ये विजेतेपद मिळवले होते. मुंबईचा संघ ४८ व्यांदा रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. तर विदर्भाने तीनदा अंतिम फेरी गाठली होती. पहिल्या डावात १०५ धावांत डाव संपल्यानंतर न डगमगता विदर्भने दुसर्या डावात मात्र, कडवी लढत दिली. मात्र, तरीही त्यांना १६९ धावांनी पराभव पत्करावा लागला.
या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सोडला तर उर्वरित चारही दिवसात मुंबई संघाचे वर्चस्व होते. विजेतेपदाचा सामना जिंकण्यासाठी मुंबईने विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने आपल्या दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली परंतु केवळ ३६८ धावांपर्यंतच मजल मारता आली.
अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत ५ गडी गमावून २४८ धावा केल्या होत्या.



