
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना लंके आणि शरद पवार यांची गुरुवारी भेट झाली. मात्र थेट पक्षप्रवेश झाला नाही. पवार यांच्या विचारसरणी मला नेहमीच मान्य आहे, असे लंके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे ते मनाने शरद पवार यांच्यासमवेत असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, लंके यांनी पक्ष प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे लंके यांचा पक्ष प्रवेश तूर्त टळला असल्याचे पुढे आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी शरद पवार यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी लंके यांच्या भेटीनंतर ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते होणार असून ते जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या तिघांंनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मात्र प्रवेशाबाबत थेट बोलणे टाळले. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा संभ्रमही कायम राहिला.



