माढा : राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरुन मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळत असून निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचे दिसत आहे.
माढा लोकसभेत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (RanjitSinh Naik Nimbalkar) यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याविरोधात नाराज गटाच्या बैठकांना वेग आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी या सर्व विरोधकांची बैठक पार पडली.
या बैठकीला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सातारा डीसीसीचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ .बाबासाहेब देशमुख, आमदार दीपक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. आता या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



