फलटण: माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने अकलूजचे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. तिकिट जाहीर झाल्यापासून शांत असलेल्या मोहिते पाटील हे आज दुपारी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
तत्पूर्वी शिवरत्नवर डिनर डिप्लोमसी होणार असून त्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर हे अकलूजमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोहिते पाटील गटाची लोकसभेसंदर्भात भूमिका ठरणार आहे. त्यामुळे अकलूजकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माढ्यातून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील हे शांत आहेत. मात्र, कार्यकर्ते उघडपणे आपली भूमिका मांडत आहेत. ते मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. आपला माणूस खासदार झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून देण्यासाठी मोहिते पाटील यांनी आज दुपारी चारच्या सुमारास अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आयाेजित केला आहे.
दरम्यान, अकलूजमध्ये मोजक्या मान्यवरांनाही बोलविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले आहेत. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण आहे. त्यात पुढील वाटचालीसंदर्भात विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे नेतेमंडळीची बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.



