महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी आघाडी अशा दोन्हीकडच्या तीन तीन पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शिमगा न केला म्हणजे मिळवली! महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर गेल्या चार वर्षात जे जे घडू नये ते ते सगळे घडले आहे. घडलेय म्हणजे बिघडलेय. कारण विधानसभा निवडणुकीत ज्या महायुती सरकारला जनतेने निवडून दिले त्यावेळी सरकार महायुतीचे न बनता महाविकास आघाडीचे सतेत आले. त्यानंतर महाविकास आघाडीला सुरुंग लावत भाजपने महायुती सरकार सत्तेवर बसवले. राज्यात मागील पाच वर्ष सर्वच पक्षाने सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची उडणार आहे हे नक्की….
देशात आणि राज्यात धोरण.. दिशा.. कायदे.. कानून.. ठरवण्यासाठी ज्या विचारधारेला जनतेने मत दिले, तीच मुळी तुटली. बहुमत ‘युती’ला मिळाले; पण सत्तेत आली ‘आघाडी’ जनतेने असे काही घडेल याची कल्पनाही कधी केली नसेल. त्यानंतर आघाडीला खिंडार पाडले गेले आणि महायुती सत्तेवरती आली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून दोन विभागण्या झाल्या. त्यानंतर जनतेला असे का झाले तर काय करावे याबाबत कायद्यात काही तरतूद नाही का? निवडून दिलले लोकप्रतिनिधी सत्तेसाठी काहीही करू शकतात याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ज्या ज्या आगळिकी झाल्या त्या सगळ्या योग्य होत्या का, जनतेला त्या आवडल्या का हे मतयंत्रातून कळणार आहे.
निवडणुकीचा प्रचार मोदीमय आहे
सत्ताधारी ‘मोदीचालिसा’ गात मते मागणार आहेत, तर विरोधक मोदींना दूषणे देत. मात्र हे करताना महाराष्ट्राचा लौकिक मातीमोल होऊ नये, याचे भान प्रचारात ठेवले जावे, असे सांगण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र महत्त्वाचा. या राज्यात लोकसभेच्या ४८ जागा तर आहेतच शिवाय येथे शरद पवार, उद्धव ठाकरे असे दिग्गज नेते मोदींशी पंगा घेत मैदानात उतरले आहेत. मतदारपाहण्या सामना रसपूर्ण, अर्थपूर्ण असेल असे दाखवताहेत. खरे तर मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतर २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकात महाराष्ट्राने मोदींना कौल दिला आहे. आणि यंदाचा सर्वेही मोदींच्या बाजूने दाखवतात.
दोन्ही निवडणुकांत मोदींसाठी ४१ खासदार महाराष्ट्राने दिल्लीला पाठवले महाराष्ट्रात भाजपप्रणित ‘एनडीए’ला २०१४ मध्ये ३८ टक्के मते मिळाली, तर २०१९ मध्ये ४५ टक्के. म्हणजे मोदींच्या पंतप्रधानपदाला सात टक्क्यांचा होकार वाढला. २०२४ ची गणिते महाराष्ट्रापुरती बदलली आहेत ती विस्कटलेल्या युतीने. महाराष्ट्रात २०२४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे धनुष्यबाण चिन्ह असलेली शिवसेना आहे; पण ठाकरेपरिवार नाही. त्यांच्या नसण्याने भाजपला किती फटका बसेल, हे निकाल सांगणार आहेत.
भाजपच्या मोदींवर गेल्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या ठाकरेंनी ‘चौकीदार चोर है’ म्हणत तोंडसुख घेतले होते; पण तरीही दोघे एकत्र होते. यंदाच्या निवडणुकीत “आपक बार भाजप हद्दपार” चा नारा ठाकरे यांनी दिला आहे. त्यावेळची कुरकूर दोघांना पुन्हा एकत्र आणले होते मात्र यंदाच्या निवडणुकीत नाराज ठाकरे अपमानित झाल्यावर घायाळ शत्रूसैन्याला जाऊन मिळाले आहेत. कित्येक वर्षांनंतर कॉँग्रेस- शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र एका व्यासपीठावर असणार आहेत.
कॉंग्रेससमवेत कधीही जाणार नाही’, हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा भाग भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ ट्वीट केला आहे. खरे तर फार वर्षांपूर्वी शिवसेनेने मुंबईत महापौरपदासाठी कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. मुरली देवरा महापौर झाले होते. त्याच देवरांचे पुत्र मिलिंद कॉंग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांना सामील झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणातील रंगामुळे सरडाही घाबरला आहे
महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी या काळात जेवढे रंग बदलले, ते पाहिले की सरडाही लाजेल. नीती-अनीतीच्या कल्पनांचा विचार करणेही कुणाला नको आहे. तब्बल एक महिना महाराष्ट्रात मतदानाची प्रक्रिया सुरु रहाणार आहे. या काळात प्रचाराची राळ उडेल;पण जनतेचे प्रश्न किमान प्रचारापुरते तरी केंद्रस्थानी असतील का? दुष्काळी वणव्यात राज्य होरपळून निघणार आहे.
बेरोजगारी वाढली आहे. वाढते नागरीकरण हे खरे तर बकालीकरण आहे. शेतमालाचा भाव, उद्योगांना बाजारपेठ, शिक्षणाचे बाजारीकरण अशा कितीतरी समस्यांचा महाराष्ट्र सामना करतो आहे. महाराष्ट्रातले नेते यावर प्रचारादरम्यान बोलतच नाहीत.
मनसेच्या राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलेय ते जागरुक रहाण्याचे. खरेच महाराष्ट्रातल्या राजकीय खडाष्टकात जनतेला गृहित धरले गेलेय. लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जूनला लागतील. देश सलग तिसऱ्यांदा भाजपलाच कौल देतो का, ते समजेल. पण तोवर मोदी हेच प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील.
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट मोदींचे कौतुक करतील. ते देशाचे ‘भाग्यविधाते’ असल्याचा दावा करतील अन विरोधक त्यास विरोध करतील. कुणाची ताकद किती ते कळेल; पण या दरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना जरा संयत भाषा वापरावी ही कर्त्याधर्त्यांना विनंती.
जमलेच तर ‘महाराष्ट्र मागे का पडतो आहे’ याचा वेध घ्यावा. एकमेकांची उणीदुणी काढण्याचा हा मौसम असतो हे मान्य; पण ते करताना भान बाळगा अन् जमलेच तर जनतेच्या प्रश्नांचा वेध घ्या. भविष्यासाठी काही चांगल्या कल्पना मांडा, अशी अपेक्षा व्यक्त करणे एवढेच आपल्या हाती आहे.
समाजकारणही ग्रस्त
एकाने वासरू मारले म्हणून दुसऱ्याने कोकरु कापले. भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावर आरोप केला त्यांनाच भाजपने आधी यंत्रणांचा धाक दाखवला अन् नंतर पदरी घेत पवित्र केले. या सगळ्या ननैतिक,अनैतिक लंबकात महाराष्ट्र गेल्या विधानसभांच्या निकालांपासून हेलकावतो आहे. या नकारात्मक, बदल्याच्या राजकारणाने महाराष्ट्राचे समाजकारणही ढवळून टाकले आहे. जातीय तेढ हेतुपूर्वक वाढवली जाते आहे, हे म्हणण्यास जागा आहे.
जनतेला या सगळ्याचा खरे तर वीट आला असणार. पोलिस ठाण्यात आमदाराने गोळ्या झाडल्याची घटना बिहारमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रात घडली ! स्खलन सर्व क्षेत्रात झाले; पण महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी कहर केला. हा सगळा गोंधळ जनता कुठल्यातरी एका बाजूला मते देत संपवणार की संदिग्ध कौल देत सुरु ठेवणार हे मतयंत्रे सांगणार आहेत.



