मुंबई – ‘आमची लढाई कोणत्या एका राजकीय पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. तर अशा एका शक्तीच्या विरोधात आहे जी ‘ईडी’, ‘सीबीआय’, प्राप्तिकर खात्याचा उपयोग गुंडांसारखा करते. हीच शक्ती मुंबई विमानतळ एकाकडून घेऊन दुसऱ्याच्या हातात एका रात्रीत सोपवते. या शक्तीच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे.
मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहेत,’ अशी जोरदार टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. नरेंद्र मोदी ‘ईव्हीएम’शिवाय निवडणुका जिंकूच शकत नाहीत असा थेट हल्ला चढवत नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी असल्याचेही राहुल गांधी कडाडले.
शिवाजी पार्क मैदानात ‘इंडिया’ आघाडीची सभा पार पडली. सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. या सभेला इंडिया आघाडीतील १५ पक्षांचे नेते उपस्थित राहिले होते. भारत जोडो न्याय यात्रेचा शनिवारी धारावी येथे समारोप झाल्यानंतर आज इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
राहुल गांधी यांनी मणीपूर ते मुंबई असा सहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला, त्यानिमित्ताने सर्व नेत्यांनी त्यांचे कौतुक केले. विद्वेष आणि हुकूमशाहीच्या विरोधातील राजकारणाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांच्या आजच्या भाषणाला नेहमीपेक्षा जास्त धार आली होती. भाजपसोबत नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करताना राहुल गांधी म्हणाले, ‘ईडी, सीबीआयची भीती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. नरेंद्र मोदी ‘ईव्हीएम’शिवाय निवडणुका जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर ‘व्हीव्हीपॅट’ स्लीप डब्यात पडते, त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे.



