कोल्हापूर : महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२ उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती येत आहे. विशेष म्हणजे पुण्यातून रवींद्र धंगेकर हे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. तर कोल्हापूर लोकसभेसाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केला आहे. यामधील ११ ठिकाणी नावे निश्चित केली आहे. मात्र, सांगली लोकसभेसाठी अद्याप नाव जाहीर केले नाही.
‘या’ नावांवर शिक्कामोर्तब
पुणे – रवींद्र धंगेकर
गडचिरोली – नामदेव किरसंड
सोलापूर – प्रणिती शिंदे
नंदुरबार – गोवाल पाडवी
अमरावती – बळवंत वानखेडे
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
नागपूर- विकास ठाकरे
8. अकोला – अभय पाटील (वंचितसोबत आघाडी झाली नाही तर)
9. नांदेड – वसंतराव चव्हाण
10. लातूर – डॉ. शिवाजी काळगे
11. भंडारा गोंदिया – नाना पटोले
काँग्रेसने महाराष्ट्रातल्या बारा जागांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती येत असून अद्याप काँग्रेसकडून याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १८ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती येत आहे. दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत यादी फायनल झाल्याचं सूत्रांकडून कळतंय.
दरम्यान, गुरुवारी मुंबईमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या यादीला अंतिम स्वरुप येणार असल्याची माहिती आहे. बुधवारी काँग्रेसने ७ जागा निश्चित केल्याचं वृत्त सर्व आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
दरम्यान, ८ मार्च रोजी काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून सात, केरळमधून १६, लक्षद्वीपमधून एक, मेघालयातून दोन, नागालँडमधून एक, सिक्कीममधून एक, तेलंगणातून चार आणि त्रिपुरातून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे.
देशातील प्रमुख लढती
काँग्रेसमध्ये यादीमध्ये वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयमधून व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांच्या उमेदवारीची घोषणा पहिल्या यादीतून करण्यात आलेली होती.
मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब या राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. घोषित केलेल्या यादीत १५ खुल्या प्रवर्गातील, ३ महिला तर २४ हे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले होते. बुधवारी जाहीर झालेली नावे सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबत काँग्रेसकडून अधिकृत माहिती आलेली नाही.



