
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱ्या १० जागांवर बुधवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विदर्भामधील ४ जागांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले असले तरी गडचिरोली व चंद्रपूरचा वाद अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान व नामदेव उंडी यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार व काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या दोन्ही इच्छुक महिला उमेदवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत. धानोरकर पक्षाध्यक्ष खरगे यांच्या भेटीसाठी निवासस्थानीही गेल्या होत्या. शिवानी वडेट्टीवारही दिवसभर दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात होत्या.
याबाबत विचारले असता, चंद्रपूरमध्ये खूप उमेदवार इच्छुक असल्याचे पटोले यांनी सांगितले. धानोरकर यांचे पारडे जड असले शिवानी वडेट्टीवार यांनीही आपला दावा अद्याप कायम ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारच्या बैठकीत या दोन्ही जागांवर तोडगा निघू शकलेला नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडण्यावर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाची सहमती झाली आहे. काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. २०१९ मध्ये ही जागा शिवसेने लढवली होती. मात्र शाहू महाराजांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने जागा सोडण्याची तयारी ठाकरे गटाने दाखवली असली, तरी त्याबदल्यात सांगलीची जागा मागितली आहे. मात्र काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांचा याला विरोध आहे. सांगली संदर्भात निर्णय मुंबईत घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.



