मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर, भाजप-शिवसेना युतीतील, त्यातही प्रामुख्याने मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. मनसेला लोकसभेची एखादी जागा द्यावयाची झाल्यास, ती कमळ वा धनुष्यबाण या चिन्हावरच दिली जावी, इंजिन या निवडणूक चिन्हाला मुंबईतून मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार नाही, असे युतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर, मनसेचा महायुतीमध्ये लवकरच समावेश होण्याचे संकेत मिळत आहेत. मनसेला महायुतीमध्ये घेणार का, तसेच त्यांना लोकसभेच्या जागा देणार का, याविषयी अद्याप भाजप वा मनसेकडून काहीच अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुळात मनसेला महायुतीमध्ये घेतले जाऊ नये, या मताचेच बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. मात्र पक्षाच्या वरिष्ठांनीची याबाबत निर्णय घेतला असेल, तर त्याविरोधात जाणे योग्य नसल्याचेही ते बोलून दाखवत आहेत.



