मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या सरकारनं आपला नवा भिडू राज ठाकरे यांना सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईतील ताज लॅन्ड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी अशा तीन लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. तसंच दक्षिण मुंबई या मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, जर असं झालं तर या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पहायला मिळेल.
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात? : मागील दोन टर्म पासून दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा दबदबा आहे. तर महायुतीकडून या जागेवर मनसेचे बाळा नांदगावकर अथवा राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळी इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असताना त्यांच्या विरोधामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेनं उमेदवार दिला नव्हता. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दक्षिण मुंबईत अमित ठाकरे यांचा थेट सामना उबाठा गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे.
ठाकरे परिवारासाठी वर्चस्वाची लढाई : अमित ठाकरे हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून उभे राहिल्यास उद्धव ठाकरे यांची भूमिका काय राहील? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दक्षिण मुंबईची जागा उबाठा गटासाठी अतिशय महत्त्वाची असताना अमित ठाकरे यांच्या पाठीमागं असलेली महायुतीची शक्ती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी हा सामना असला तरी सुद्धा थेट उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशा दोन बंधूंमधील हा सामना असणार आहे. मात्र, ठाकरे कुटुंबातून कुणाला पाठिंबा मिळेल हे पाहणं महत्वाचं असेल.



