सोलापूर : काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथे आमदार राम सातपुते यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, येथील लढत रंगतदार होणार आहे.
भाजपाने यापूर्वी महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर, आता तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये, सोलापुरातून आमदार राम सातपुते, भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी तरुण लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ५ व्या यादीत भाजपाने कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.



