वाई : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित केलेली असताना व उदयनराजे भोसलेच साताऱ्यातून लोकसभा लढणार असे आता निश्चित झालेले असताना लोकसभेची जागा भाजपाला सोडण्यास साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आयत्यावेळी अजित पवारांनीही नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा खूप मोठा परिणाम सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर झाला आहे. अशातच लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नेतृत्वाकडून तळ्यात मळ्यात अशी दुहेरी भूमिका घेतली जात आहे. यामुळे आमदार, प्रमुख कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नेतृत्वाकडून स्पष्ट संकेत मिळत नाहीत त्यामुळे सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असताना, तळागाळात मतदार व जनसंपर्क असताना, सर्वात जास्त संस्था आपल्या ताब्यात असताना, महायुतीत सामील झाल्याने आमदारांपासून प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपापुढे बोटचेपी भूमिका घ्यावी लागत आहे.
भाजपा साताऱ्यात निवडणूक तयारी व जनसंपर्क वाढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा उठविण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे. अशातच लोकसभा मतदारसंघ सोडल्यास पक्षाच्या जिल्ह्यातील राजकारणावर त्याचा खूप मोठा परिणाम होईल ही भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.



