मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी माजी आमदार विजय शिवतरे यांच्याकडून वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचा धर्म पाळणार नसेल तर आम्ही महायुती मधून बाहेर पडू असा इशारा प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे.
द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, “आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे यांनी अश्लाघ्य टीका केल्यापासून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र आजही त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
मात्र शिंदे गटाने शिवतारे यांच्या पवित्र्याबाबत सावध भूमिका घेतल्याचे दिसते. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट याबाबत बोलताना म्हणाले की, आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. महायुतीत राहायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. जर हे मान्य नसेल तर प्रत्येकाला आपला स्वतःचा मार्ग आहे. आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, “आम्ही कोणत्याही उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून थांबवू शकत नाही. एखादा व्यक्ती पक्षात असेल तर त्याला पक्षाच्या चौकटी लागतात. पण जर कुणी पक्षच सोडला तर त्याला पक्षाचे आदेश लागू होत नाहीत. अशी व्यक्ती स्वतंत्र असतो, त्याला आम्ही अडवू शकत नाही. विजय शिवतारे यांना बारामतीमधून लढायचे असेल तर त्याच्याशी आमचा संबंध नाही.” शिंदे गटाच्या या पवित्र्यामुळे विजय शिवतारे यांच्याबाबत शिंदे गट फारसा गंभीर नाही, असे चित्र अजित पवार गटात निर्माण झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.



