मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडी आणि महायुतीसाठी एक एक नेता महत्त्वाचा असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर महायुतीच्या गळाला लागले आहेत. महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसंच आपण महायुतीसोबतच राहणार आणि महायुतीचं काम करणार असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलं आहे.
महादेव जानकरांना लोकसभेची एक जागाही देण्यात येणार असल्याचं पत्र समोर आलं आहे. या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि स्वत: महादेव जानकर यांची सहीदेखील आहे. आता महादेव जानकरांना नेमकी कोणती जागा देण्यात येणार, याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमच्यासोबत आला तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला द्यायला तयार असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं, यानंतर महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. पण आता महादेव जानकरांनी आपण महायुतीसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एवढच नाही तर त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून एक जागाही मिळणार आहे.
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) उमेदवारांबाबत पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यात व्यस्त आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात ओबीसी आणि धनगर मतदारांची संख्या मोठी असल्याने महादेव जानकर हे विजयी उमेदवार मानले जात होते. तसंच माढातून लढले असते तर सुप्रिया सुळे यांनाही बारामतीत फायदा झाला असता. माढा आणि बारामती या दोन्ही लोकसभा जागा एकमेकांना लागून आहेत. 2003 मध्ये जानकर यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला.
महादेव जानकर यांनी 2009 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि सुमारे एक लाख मते मिळवून ते तिसऱ्या स्थानावर होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढले होते. एनडीएने ही जागा त्यांच्या पक्ष राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली होती. त्यांचा अवघ्या ६९७१९ मतांनी पराभव झाला. 2014 मध्ये मताधिक्य इतके कमी झाल्यानंतरच भाजपला पहिल्यांदाच बारामतीचा बालेकिल्ला जिंकता येईल असे वाटले.
2015 मध्ये महादेव जानकर यांची विधान परिषदेवर निवड झाली. 2016 ते 2019 या काळात ते फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री होते. गेल्या वर्षभरापासून भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षाकडे दुर्लक्ष करत असल्याचा राग त्यांच्या मनात होता. त्यामुळे शरद पवार त्यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या कोट्यातून ही जागा त्यांच्यासाठी सोडणार हे जवळपास निश्चित होते, मात्र अखेरच्या क्षणी भाजपला आपल्या नाराज मित्रपक्षाची समजूत काढण्यात यश आले. करारानुसार राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा दिली जाईल. ही जागा कोणती असेल हे अद्याप ठरलेले नाही. भाजपने यापूर्वीच माढा येथील उमेदवारी रणजीत नाईक निंबाळकर यांना जाहीर केली आहे.



