नाशिक, प्रतिनिधी : महायुतीमध्ये काही लोकसभा मतदार संघात जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यामध्ये नाशिक लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे यांचं नाव चर्चेत आहे. मात्र दुसरीकडे नाशिकच्या जागेवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नाशिकची जागा समीर भुजबळ यांना सोडावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मात्र ही बातमी समोर येताच नाशिक शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्र्यांसह आमदार, नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नाशिकची जागा आपल्याकडेच ठेवावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ही जागा कुणाला सोडू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. ज्या काका, पुतण्याला गोडसे यांनी लाखोंच्या फरकानं पराभूत केलं, त्यांना उमेदवारी सोडू नका असं म्हणतं सुहास कांदे यांनी भुजबळांचं नाव न घेता टोला लगावला आहे. मराठा बहुल मतदार संघात मराठा उमेदवारास डावलून भुजबळांना जागा सोडल्यास राज्यात चुकीचा संदेश जाईल अशी भीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.



