कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींना मविआ जागा सोडणार होती. रासपच्या जानकरांनाही जागा सोडली जाणार होती. वंचितसोबतही चर्चा सुरु होती. परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे. जानकरांनी फडणवीसांची भेट घेत महायुतीतूनच लोकसभा लढण्याचा शब्द घेतला आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी काल लाचारी कदापी स्वीकारणार नाही, असे म्हणत स्वतंत्र लढण्याचे व तिसरी आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यातूनच त्यांनी काल सायंकाळी मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
अशातच आता राजू शेट्टी यांनी देखील वारे पाहून फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. महायुतीचा पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल, तर स्वाभिमानी विरोधात उमेदवार देऊ नये, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
5 एप्रिल 2021 ला कोल्हापूरला झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकारणीमध्ये चर्चा झाली होती. महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध सोडून आपण इथून पुढे स्वतंत्र निवडणुका लढवायच्या हा निर्णय जवळपास तीन वर्षांपूर्वी झालेला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुखांना व शरद पवार यांना आम्ही आघाडी सोडतोय असे नऊ पाणी पत्रही दिले होते. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या पत्राची काही दखल घेतली नाही. त्यामध्ये उपस्थित काही मुद्दे होते त्याचे काही उत्तर मिळाले नाही म्हणून आम्ही संघटनेमार्फत हा निर्णय घेतला आहे, असे शेट्टी म्हणाले.




