महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या बाबतीत तिढा सुटलेला नाही. त्यामुळे बैठकांवर बैठका सुरु आहेत. त्यातच गुरुवारी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक मुंबईमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रचाराच्या संदर्भात चर्चा झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. बैठकीसाठी खुद्द शरद पवार यांचीही उपस्थिती होती.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कुठल्या मुद्द्यावर प्रचार करावा आणि जनतेसमोर काय मांडले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा झाली. प्रचाराचे मुद्दे पॉझिटिव्ह असले पाहिजेत निगेटिव्ह नकोत, असं बैठकीत ठरलं आहे.
आव्हाड पुढे म्हणाले की, सगळे नेते प्रचाराच्या मुद्द्यावर एकत्रित बसलो होतो. पुढच्या दीड-दोन महिन्यातील प्रचार कसा करायचा, मुद्दे कसे असावेत.. यावर चर्चा झाली. प्रचाराच्या घोषणांवरही चर्चा झाली असून ”बस हुई महंगाई की मार अब क्यू चाहिए मोदी सरकार?” ही घोषणा ठरल्याचं आव्हांनी सांगितलं.


