
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने आठ, काँग्रेसने सात, शरद पवार गटाने पाच आणि अजित पवार गटाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. दरम्यान, कल्याण लोकसभेबाबत कोणत्याही पक्षाने अद्याप निर्णय घेतला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, श्रीकांत शिंदे यांना यंदा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण असताना ठाकरे गटाने मात्र या मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या आठ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. मात्र त्यांनी त्यांच्या मुलाची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजपा नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसेच हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी भाजपा नेते आग्रही आहेत. त्यामुळे या जागेबाबत महायुतीत तिढा निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे कल्याण लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरणं अद्याप बाकी आहे. अशातच महाविकास आघाडीचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला आहे. महायुतीत हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाला असल्याचं बोललं जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना कल्याण लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.


