नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाली झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची चांगलीच धाकधूक वाढली आहे. भुजबळांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.
नाशिक लोकसभेची जागा सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाकडे असून तेथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी केली असून हॅट्रिक करण्यास ते इच्छुक आहेत. मात्र त्यांची हॅट्रिक वाटते तेवढी सोपी नाही. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या या जागेवर भाजपनेही दाव ठोकला असून आता राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे नाव सध्या जोर धरत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. आता मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा ठोकला असून नाशिक लोकसभेचा पेच आणखी वाढला आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेचा जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे.


