
नागपूर: महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली निवड झाली आहे. आपले नाव आम्हाला एमपीएससीच्या सदस्यांकडून समजले आहे. मुलाखतीमधील गुण वाढविण्यासाठी आम्ही मदत करू शकतो. इच्छा असल्यास आपण संपर्क साधू शकता, असे फोन गेल्या महिन्या-दोन महिन्यात उमेदवारांना आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी स्टूडंट्स राईट्स असोसिएशनने एमपीएससीच्या अध्यक्षांकडे केली आहे.
एमपीएससी या स्वायत्त संस्थेवर राज्यातील लाखो उमेदवारांचा विश्वास आहे. अशाप्रकारे कोणी गैरकृत्य करुन त्या विश्वासाला तडा देत असेल तर ते योग्य नाही. उमेदवारांचे मोबाईल नंबर कसे उपलब्ध होत आहेत ? कोणत्या पॅनलला तुमची मुलाखत येणार आहे हे सांगितले जात आहे. अशी गोपनीय माहिती कशी काय बाहेर येत आहे? कोणत्या अधिकाऱ्याच्या संमतीने ही माहिती बाहेर येत आहे, याचा शोध घेणे महत्वाचे आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून आयोगाने याबाबत एक समिती गठित करुन चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.


