![]()
छत्रपती संभाजीनगर : हर्सूल कारागृहाबाहेर डीजेच्या तालावर पोलिसांनी रात्री अकरा वाजता बेधुंद नृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंभीर गुन्हेगार शिक्षा भोगत असलेल्या हर्सूल कारागृहाबाहेरच पोलिसांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात डीजेच्या कर्णकर्कश आवाजात बेधुंद नाच केला. कारागृहाच्या ऐन प्रवेशद्वारावरच आचारसंहितेत नियम धाब्यावर बसवून पोलिसांचा भर रस्त्यावर बेधुंद नाचगाण्याचा व्हिडीओ रात्री ११.३० नंतर व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये गणवेशात असलेले पोलीस आणि काही व्यक्ती गाण्याच्या कर्णकर्कश आवाजावर बेधुंदपणे नाचत आहेत. काही पोलीस हवेत स्नो स्प्रे करताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांनी याचा व्हिडिओ केल्यावर हा प्रकार समोर आला. काही स्थानिक सहभागी झाल्याचं देखील भान या पोलिसांना उरलं नव्हतं. एकीकडं लोकसभेच्या आचारसंहितेमुळं सामान्यांसाठी बहुतांश गोष्टींवर निर्बंध आहेत. रस्त्यावरील प्रत्येक उत्सवासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असताना, हर्सूल कारागृहाबाहेरच सुरू असलेल्या धिंगाण्यामुळं गंभीर प्रश्न उपस्थित झाला.
पोलिसांवर कारवाई होणार का?
डीजेवर न्यायालयानं बंदी घातली असतानाही अनेक कार्यक्रमात डीजेचा वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं अशावेळी पोलिसांवर कारवाईची जबाबदारी असते. मात्र,आचारसंहिता काळात संभाजीनगरमध्ये चक्क पोलिसांनीच डीजे लावून ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी तर अंगावर गणवेश असताना देखील डान्स केला. हर्सूल कारागृहात अनेक गुन्ह्यातील आरोपी कैद आहेत. त्यामुळं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं नेहमी काळजी घेतली जाते. मात्र, असं असताना देखील थेट हर्सूल कारागृहाच्या प्रवेशावर शनिवारी रात्री झालेला गोंधळ पाहता याची गंभीर दखल घेऊन कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.



