
शिरूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश असून वंचितने शिरूरमधून मंगलदास बांदल यांना मैदानात उतरलं आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिले आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत बांदल यांनी सहभाग घेतला होता. मोहोळ यांच्या प्रचारासाठी वडगाव शेरी इथं आयोजित संवाद मेळाव्यात मंगलदास बांदल हे व्यासपीठावर उपस्थित होते. याच बांदल यांना वंचितने उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
पैलवान असलेले मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरले. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणी ते जवळपास पावणे दोन वर्ष तुरुंगात होते. मागील वर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्याआधीही फसवणूक, खंडणी, पाणीचोरी अशा विविध प्रकरणांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मंगलदास बांदल यांच्याविरोधात विविध गुन्हा दाखल
एका सेवा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची जमीन बळकावण्यासाठी त्रास देत व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या भावावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ज्ञानदेव तनपुरे यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली होती. तसंच व्हिडिओ क्लिप सोशल माध्यमावर व्हायरल करण्याची, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत लक्ष्मी रस्त्यावरील नामांकित सराफाला ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात बांदल यांना अटक होऊन नंतर जामिनावर सुटका झाली होती.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने शिरूरची लढत तिरंगी होणार आहे. कारण या मतदारसंघातून यापूर्वीच महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



