
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावा केला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील इच्छुक होते. अशातच मंगळवारी रात्री उशिरा किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माघार घेतली. त्यामुळे नारायण राणेंचा मार्ग मोकळा झाला आहे अशीही चर्चा रंगली आहे. मात्र, अधिकृतरित्या याबाबत किरण सामंत यांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिलेली नाही.
अशातच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेबाबत नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून इतर नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आधी शिवसेनेचे खासदार जिंकले. त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र, या जागेमुळे नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जागेसाठीची वाटाघाटी थांबली आहे.



