
नाशिक : महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या संवाद सभेचे सिन्नर येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नाशिकमधील ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी संवाद सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संवाद यात्रेत बोलत होते. महायुतीतील उमेदवारीसंदर्भात बोलताना त्यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. गोडसेंऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याच्या चर्चांवर बोलताना ‘ठाकरेंसोबत गद्दारी करणाऱ्यांना आता उमेदवारीसाठी मुंबईला फिरावं लागत आहे’ अशा शब्दात बडगुजर यांनी गोडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.
जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी न देण्याच्या भूमिकेत सध्या महायुती आहे. नाराज खासदार हेमंत गोडसे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा मोठा गौप्यस्फोट बडगुजर यांनी केला. ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. हेमंत गोडसे यांची तीन माणसं माझ्याकडे येऊन गेली. आम्हाला पदरात घ्या, असे ते म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं आता गद्दारांना माफी नाही. वेळ निघून गेली आहे, तुम्ही तुमच्या पक्षात परत जा आणि समोरून लढा. बडगुजर यांनी यापूर्वी देखील हेमंत गोडसे हे मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता.



