
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली असून चार नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर, हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामिड आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. जळगावचे विद्यमान भाजप खासदार यांनी आजच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही क्षणांतच उद्धव ठाकरेंनी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.
भाजपने तिकीट वाटपात डावलल्यानंतर उन्मेष पाटील हे पक्षावर नाराज होते. जळगावात भाजपने पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जात शिवबंधन हाती बांधलं. पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र पाटील यांच्या सहमतीनेच उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे.



