बुलढाणा : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षाकडून तिकीट वाटप करण्यात येतंय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे. त्यातच मूळ शिवसेनेला खिंडार पडून दुसऱ्या शिवसेनेची निर्मिती झाल्याचा परिणाम आता या निवडणुकीत दिसून येतोय. कारण भाजपच्या हट्टामुळे अनेक ठिकाणांवरून शिंदेच्या उमेदवारांना माघार घ्यावी लागलीय. यावरूनच आता ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेण्यात आला .
याविषयी बोलताना शिवसेनेच्या (ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर टीका केलीय. यावेळी बोलताना,”शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठबळामुळे मोठे होऊन त्यांनी गद्दारी केली. त्यापैकी पाच गद्दारांना निवडणुकीपूर्वीच (उमेदवारीच न मिळाल्याने) धडा मिळाला आहे. उर्वरित गद्दारांना जनता अर्थात मतदार धडा शिकविणार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
बुलढाणा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज अर्ज दाखल केला. यानंतर पार पडलेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जालिंदर बुधवत, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.


