रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना-भाजपा दोन्हीकडून दावा केला जात आहे. अशातच बैठकांचे सत्र देखील दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. आज रत्नागिरी येथे शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक हाँटेल विवेकमध्ये संपन्न झाली. रत्नागिरीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ही बैठक होती. या बैठकीला मंत्री उदय सामंत उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाबाबत यावेळी भूमिका बैठकीत मंडण्यात आली.
किरण सामंत यांना कार्यकर्त्यांनी उचलून नेलं व्यासपीठावर : किरण सामंत यांचं बैठकीच्या ठिकाणी आगमन झालं, त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत व्यासपीठावर नेलं. तसंच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत किरण सामंत यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. भाजपाच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाची ही पहिलीच बैठक होती.