नितीश रेड्डीचा विजयी षटकार आणि हैदराबादच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा सहज पराभव केला. हैदराबादने ११ चेंडू आणि ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये एक शानदार सुरूवात करून दिली. संपूर्ण सामन्यात चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. ज्याचा संघाला मोठा फटका बसला.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.१ षटकांत ४ गडी गमावून १६६ धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.
हैदराबादच्या सलामीवीरांनी संघाला दणदणीत सुरूवात करून दिली. पहिल्या षटकात हेडचा झेल सुटला, ज्याचा चेन्नईला फटका बसला अन् अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. अभिषेक शर्माने तर आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केले. त्याने १२ चेंडूत ३७ धावा करत सामना चेन्नईपासून दूर नेला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी १७ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी दीपक चहरने तोडली. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चहरने अभिषेक शर्माला रवींद्र जडेजाकडून झेलबाद केले.




