भंडारा : प्रदेशाध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढावे लागणार आहे. त्यामुळे मला एकट्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरते अडकवून ठेवू नका, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पटोले हे भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक लढणार नसल्याचे मानले जात आहे.
भंडार-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी साकोली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, माजी आमदार अनिल बावनकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



