पुणे : ‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो,’ अशी प्रतिक्रिया अनौपचारिकपणे बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केली; तसेच सातारा आणि माढा या दोन्हीही मतदारसंघांतील उमेदवारांचा निर्णय झाला असून, येत्या दोन दिवसांत तो जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पवार यांनी साताऱ्याची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते जयंत पाटील यांनी चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. उभयतांमध्ये सव्वा तास चर्चा झाली होती. त्या वेळी शरद पवार गटाकडून चव्हाण यांना साताऱ्यातून लढण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. चव्हाण यांनी साताऱ्यातून लढण्याची तयारी दर्शवली असली तरी, त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यास पवार यांनी विरोध दर्शविला आहे.
पवार यांच्या पक्षाकडून साताऱ्यातून लढण्यासाठी चार नावांची चाचपणी करण्यात आली आहे. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर आणि सुनील माने यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. तर, एकनाथ शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनी पवार यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांचा पर्याय मागे पडल्यास शशिकांत शिंदे यांच्या नावावर पवारांच्या पक्षाकडून शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



