
सातारा : सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अद्याप साताऱ्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्याविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उभे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला असल्याने माढ्यातून त्यांनी फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर, तर अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यापैकी एकाला संधी देण्याचे निश्चित केले आहे.
उदयनराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी नकार दिल्यास आमदार शशिकांत शिंदेंच्या नावावर पवार शिक्कामोर्तब करणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
माढासाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार यांनी संजीवराजे निंबाळकर व धैर्यशील मोहिते-पाटील यापैकी एकाच्या नावावर एकमत करण्याची संधी दिली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होण्यास अद्याप सहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.



