ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची थेट घोषणा करून टाकली. यातून भाजपने अप्रत्यक्षरीत्या ठाण्यावर दावा केला असून त्यामुळे शिंदे यांची कोंडी झाल्याची चर्चा रंगली आहे.
पक्षातील अन्य खासदारांच्या उमेदवारीविषयी स्पष्टता येत नाही, तोवर श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करायची नाही असा निर्णय शिंदे यांनी घेतला होता. शिवाय, ठाण्याची जागा कोणाला मिळते, यावर पुढील व्यूहरचना अवलंबून होती. ठाणे किंवा कल्याण यापैकी एक जागा सोडावीच लागली, तर कल्याणवर पाणी सोडून श्रीकांत शिंदेंना ठाण्यात आणण्याची रणनीती शिंदे गटाने आखली होती. मात्र ठाणे पदरात पडावे यासाठी फडणवीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांची बाजू वरचढ असल्याचा दावा सर्वेक्षणाच्या आधारे केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीस यांनी नागपुरातून परस्पर जाहीर करून टाकली. यामुळे आता भाजपने ठाण्यावरील दावा आणखी प्रबळ केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं”, असा डायलॉग त्यांनी मारला. “आधी सर्व सहकाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर श्रीकांतचे नाव जाहीर करेल. माझ्याजागी दुसरा कुणी असता तर पहिल्याच यादीत मुलाचे नाव जाहीर केले असते. पण मी कार्यकर्त्यांचा नेता असल्यामुळे आधी कार्यकर्त्यांचे काम करतो.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.



