
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन संजय शिरसाट यांनी भेट घेतली. मनसेचा महायुतीतील सहभाग लांबलेला असतानाच संजय शिरसाट यांनी ही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु झाली आहे. परंतु ही कुठलीही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा रंगली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास संजय शिरसाट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. “राज ठाकरे आणि आमचे जुने संबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठवाड्यात सभा व्हायच्या, तेव्हा राज ठाकरे आवर्जून त्यांना उपस्थित राहायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. तसंच आमचं आहे. फार दिवसांपासूनची इच्छा होती, की राज ठाकरेंशी गप्पा माराव्यात. भेटल्यावर राजकीय विषयावर थोड्याबहुत चर्चा होत असतात, पण आता पुढे काय करायचं, यांनी काय करायचं, अशा विषयांवर आज चर्चा नव्हत्या. आज आम्ही फक्त जुन्या आठवणींना आम्ही उजाळा दिला” अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.
मनसेसाठी लाल गालीचा अंथरला आहे
मनसे नेते राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शाह यांच्यापासून राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत भेटीगाठी घेतल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकरही याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करत आहेत. मात्र महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का? याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रश्नावर बोलत असताना संजय शिरसाट म्हणाले की, मनसेचा निर्णय वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. पण लवकरच मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्यात राज ठाकरे पुढची दिशा जाहीर करणार आहेत. त्यामुळे महायुतीला आणखी एक चाक जोडले जावे, अशी आमची इच्छा आहे.



