अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीत भाजपने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने तिकिट दिल्यानं नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी रवी राणा यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं. एक दिवस नवनीत राणा याच रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील असा दावा बावनकुळे यांनी केला होता. आता यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली असून नवरा बायकोवर बाहेरच्याने बोलू नये असं त्यांनी म्हटलंय.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. नवनीत राणा यांनी स्पष्टच म्हटलं की, मी रवी राणा यांंची बायको म्हणून सांगते, मी भाजपमध्ये आहे. माझे नेते नरेंद्र मोदी, अमीत शहा व देवेंद्र फडणवीस आहेत. मी माझा निर्णय स्वतः घेतला आहे. त्यांच्या मर्जीनुसार रवी राणा निर्णय घेतील. तर नवरा बायकोमध्ये कोणी बाहेरच्यांनी न बोललेलं बरं असा टोला नवनीत राणा यांनी बावनकुळे यांना लगावला आहे.



