मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. मनसे आता महायुतीत सहभागी होणार, अशा चर्चांना जोर आला होता. परंतु, या भेटीत नेमकं काय ठरलं? हे गुलदस्त्यात होतं. या भेटीबाबत भाजपा किंवा मनसेने कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. दरम्यान, राज ठाकरे यांनी या भेटीबाबत मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात सविस्तर माहिती दिली.
राज ठाकरेंनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा लढवणार, मनसेने कोणत्या जागांसाठी आग्रह धरला आहे? यावर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. त्या चर्चांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, होय! जागावाटपावर चर्चा झाली. मात्र मला अशा चर्चा जमत नाहीत. मी खरं सांगतो, मी जागावाटपाच्या चर्चेला १९९५ साली शेवटचा बसलेलो. त्यानंतर आजतागायत मी अशा चर्चेला बसलो नाही. कारण अशी चर्चा करणं मला शक्यच नाही. तू दोन जागा घे, चार जागा मला दे, ही जागा मला नको, ती जागा तू घे, मला इथे सरकव, तू तिथे जा… असली चर्चा मला कधीच जमणार नाही. माझ्याच्याने हे होणार नाही. त्यानंतर मला सांगण्यात आलं की, आमच्या पक्षचिन्हावर निवडणूक लढा, मी त्यांना (भाजपा) स्पष्ट सांगितलं ते होणार नाही.
मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.



