मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या यादीत सातारा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आतापर्यंत या पक्षाकडून एकूण नऊ जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी 10 जागा सुटल्या आहेत. त्यापैकी 7 उमेदवारांची घोषणा पक्षाकडून आधीच करण्यात आली होती. आज तिसरी यादी जाहीर करुन पक्षानं नऊ उमेदवारांची घोषणा केली. तर माढा लोकसभेचा तिढा सुटलेला नाही. माढा लोकसभेत महायुतीनं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळं आता शरद पवार आपल्या कोणत्या शिलेदाराला मैदानात उतरवतात. याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
शशिकांत शिंदे सोमवार 15 मार्चला ते शक्तीप्रदर्शन करत शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीनं अद्याप अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही. मात्र, उदयनराजेंनी जिल्हाभर गाठीभेटी आणि मेळावे सुरू केल्यानं त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. दुसरीकडे आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही आपण इच्छूक असून उमेदवारीचा निर्णय बाकी असल्याचं वक्तव्य केलंय. महायुती उमेदवाराचं नाव कधी जाहीर करणार, याची उत्सुकता लागून आहे.
आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार :
- बारामती – सुप्रिया सुळे
- वर्धा – अमर काळे
- दिंडोरी – भास्कर मगरे
- शिरुर – डॉ. अमोल कोल्हे
- अमहदनगर – निलेश लंके
- बीड – बजरंग सोनवणे
- भिवंडी – सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे
- सातारा – शशिकांत शिंदे
- रावेर – श्रीराम पाटील


