
मुंबई : महाविकास आघाडीत उत्तर मुंबई लोकसभेची जागा काँग्रेस लढवणार असल्याचे जाहीर होताच पक्ष ‘कामाला’ लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मानले जाणारे विनोद घोसाळकर यांना काँग्रेसने ऑफर दिली होती. घोसाळकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. परंतु घोसाळकरांनी काँग्रेसची विनंती धुडकावली. संजय राऊत यांनीही घोसाळकर काँग्रेसच्या चिन्हावर लढणार नसल्याचं स्पष्ट केलं.
“महाविकास आघाडीच्या जागावाटपात उत्तर मुंबई लोकसभेची सीट काँग्रेसकडे गेली आहे. या जागेवरुन शिवसेना (ठाकरे गट) लढली, तर इंडिया आघाडीला एक जागा मिळेल, अशी जनभावना आहे. मी चांगला उमेदवार ठरुन भाजपच्या पियुष गोयल यांना चांगली लढत देऊ शकतो, अशी चर्चा काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू होती.” असं विनोद घोसाळकर म्हणाले.
अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेतृत्व घेतील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर आणि हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितले, परंतु मी त्यांना सांगितले की मी शिवसैनिक म्हणून काम करत आहे आणि मी फक्त या लोकसभेसाठी इतर कोणत्याही पक्षातून लढू शकत नाही.” असंही घोसाळकर म्हणाले.



