पुणे : देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी औद्योगिक क्षेत्राचा वेगवान विकास गरजेचा असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) च्या पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टरच्या वतीने आयोजित ‘पुणे आणि जवळपासच्या औद्योगिक परिसरातील मनुष्यबळ व्यवस्थापकांसमोरील आव्हाने व उपाययोजना’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी औद्योगिक कंपन्यामधील मनुष्यबळ व्यवस्थापकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्यात येतील असेही सांगितले. निवडणूक आचारसंहिता असल्याने कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यासाठी मार्गदर्शक नियमांचे बंधन असल्याने आपण कोणतीही जाहीर घोषणा करू शकत नसल्याचे स्पष्टीकरण देत, नंतर मात्र एनआयपीएमच्या शिष्टमंडळाला बोलावून या समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत आपण निश्चितच बैठक घेऊ.
औद्योगिक परिसरातील झुंडशाही आणि गुंडशाही पुणे शहर हे देशाच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे शहर असून विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग आणि आय. टी. हब म्हणून पुणे शहर ओळखले जाते. पुणे शहरात उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ, चांगली शाळा, महाविद्यालये आणि एकूणच सर्व पायाभूत सुख सुविधा यामुळे पुणे शहर हे कायमच उद्योगजगताच्या गुंतवणुकीसाठी आकर्षण बिंदू ठरले आहे. देशात कोणताही नवीन उद्योगधंदा यायचा असल्यास प्रथम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पुणे शहर यालाच प्राधान्य असते त्यामुळेच या शहराची औद्योगिक भरभराट झाली आहे. मात्र गेल्या काही काळापासून पुणे शहर आणि पुण्याजवळील औद्योगिक परिसरातील झुंडशाही आणि गुंडशाही अतिशय टोकाला गेल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेक मनुष्यबळ व्यवस्थापक हे त्याचे बळी ठरत आहेत.
योग्य कारवाई करणार
कोणतीही नवीन फॅक्टरी सुरु होणार असेल तर त्यासाठी खडी, वाळू, बांधकाम साहित्य तसेच लेबर कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट, पाणी टँकर, वाहतूक कंत्राट, हे आपल्याकडूनच घ्यावे आणि तेही आम्ही सांगू त्याच दरात घ्यावे असे म्हणून प्रचंड प्रमाणात दमदाटी केली जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. यावर नक्की योग्य ती कारवाई करण्यासाठी आपण योग्य त्या सूचना संबंधित विभागांना देऊ, त्याबाबत पाठपुरावा घेऊ असेही अजित पवार म्हणाले.



