मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहतंय. सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केलीय. आरोप-प्रत्यारोप, टीका-टीपण्णी करताना सर्वच राजकीय नेते सध्या दिसून येत आहेत. यात आता ‘पुत्रप्रेम’ हा शब्द नव्यानं समोर आलाय. “पुत्रप्रेमामुळंच शिवसेना फुटली,” असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. याला आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.
पुत्रप्रेमामुळं भारत सामना हरला
मुंबई, नवी मुंबईतील मनसेच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केलाय. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. पुत्रप्रेमामुळंच शिवसेना फुटली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी भंडारा येथील सभेतून केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळंच भारत हा विश्वचषकाचा अंतिम सामना हरला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि जय शाह यांना टोमणा लगावला.
याचा अर्थ असा होतो की, 2023 मध्ये विश्वचषक झाला. याचा अंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे ऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला अंतिम सामना भारतानं हरला होता. दरम्यान, अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे ‘बीसीसीआय’ मध्ये वरिष्ठ पदावर आहेत. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला.



