पुणे : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुती व महाविकास आघाडी यांच्यात तिकीटवर प वरून अजूनही रणकंदन सुरू आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला या संघटनेने जिल्ह्यात चार उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे बारामती मतदारसंघातून शरद पवार नावाच्या एका रिक्षाचालकाला उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे असून आत्ता बारामती मधून भारतीय गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या रिक्षाचालक शरद पवार यांची जोरदार चर्चा सुरू आहे.
गीग कामगार मंच तसेच बघतोय रिक्षावाला संघटनेकडून शरद पवार यांच्यासहित पुणे जिल्ह्यात ४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यात बारामती मधून रिक्षाचालक शरद पवार यांना तर पुणे लोकसभा मतदार संघातून टेम्पो चालक मनोज वेताळ,मावळ मधून कॅब चालक संतोष वालगुडे आणि शिरूर मधून फूड डिलिव्हरी बॉय स्वप्नील लोंढे यांना उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारांच्या प्रचारार्थ १८ एप्रिल २४ रोजी प्रचार सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करून बारामतीच्या उमेदवार शरद पवार यांचा अर्ज भरण्यात येणार आहे.



