बारामतीत वहिणींना कोणीही थांबवू शकणार नाही. बारामतीच्या मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या उमेदवार कांचन कुल, तिसऱ्या नंबरवर असणारे नवनाथ पडळकर यांच्यासह सर्वच तगडे नेते इथे आहेत. आता आपल्याला केवळ बारामतीत घरोघरी जाऊन, जनतेपर्यंत पोहोचून लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणायचं आहे. मला विश्वास आहे की, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातीलच. आपल्या आशीर्वादाने नवा इतिहास घडेल आणि सुनबाई खासदार बनून दिल्लीला जातील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत निश्चित झाली आहे.आज महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात जाहीर सभा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे महायुतीचे दिग्गज नेते सभेसाठी उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार यांनी भाषणात शिवसेना नेते विजय शिवतारे यांचं कौतुक केलं. तसेच भाजपा नेत्यांना विनंती केली.



